
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागल्याने बुधवारी रात्री उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वाल्मिक कराडवर सेमी आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय. कराडला अटक केली मात्र तो आता एसी ICUमध्ये झोपलाय. त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईन असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराडला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईन. वाल्मिक कराडला अटक केली पण आता ICUमध्ये झोपलाय आहे. आता कराडला मोठे मोठे आजार होतील. वाल्मिक कराडला पहिले हॉस्पिटलमधून बाहेर काढा . मी पण कराडच्या जातीचा आहे . पण कराड सारखी पैदास जातीला बदनाम करते, असे माझे स्पष्ट मत आहे. वंजारी समाजाला बदनाम करण्याच काम सुरु आहे . वंजारी समाजाचे 40 लोक आयपीएस झाले याचा अभिमान आहे.
चार्जशीटमध्ये नाव का नाही? आव्हाडांचा सवाल
पोलिसांवर राजकीय दबाव असतो. सर्व पुरावे असूनही पोलीस अटक करत नाही. चार्जशीटमध्ये नाव का नाही पोलिसांनी उत्तर द्यावे. महारष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडविण्याची काम सुरु आहे, असेही आव्हाड म्हणाले.
वाल्मिक कराड रुग्णालयात
वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात कराडला दाखल करण्यात आलं असून अद्याप त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान वाल्मिक कराडची सिटी स्कॅन चाचणी झाली असून त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आला. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मिक कराडच्या उपचाराची पुढील दिशा ठरणार आहे.
मुंबईत आज सर्वपक्षीयांचा जनआक्रोश मोर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज मुंबईत सर्वपक्षीयांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.मुंबईतील या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झालेत. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला.. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबानेही सहभाग घेतला. तर जितेंद्र आव्हाडही या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आलं.