
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्याखाली बीडच्या कारागृहात मुक्कामी आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक झाल्यामुळे या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोपही केले आहे. पण दुसरीकडे, भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीशिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले धाराशीवच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यायचा की नाही हा अजित पवार यांच्या गटाचा विषय आहे. मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी यावर बोलणं योग्य नाही. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं की, धनंजय मुंडे यांच्याबाबत ठोस पुरावे दिसत नाहीत, त्यात त्यांचा हात नाही. मग त्यांनी राजीनामा का दिला पाहिजे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
तसंच, हा राष्ट्रवादी अजित पवार गटातला प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, अजित पवार ठरवतील, असं सांगत शिवेंद्र भोसले यांनी अजित पवाराकडे बोट दाखवलं.