
जम्मू आणि काश्मीरसाठीची वंदे भारत (Vande Bharat train) एक्स्प्रेसची प्रतीक्षा आता जवळपास संपली आहे. या रेल्वेची चाचणी आता पूर्ण झाली आहे. भारतीय रेल्वेने आज शनिवारी श्री माता वैष्णोदेवी कटरा (SVDK) रेल्वे स्थानक ते श्रीनगर रेल्वे स्थानकापर्यंत पहिल्या वंदे भारत रेल्वेची चाचणी घेतली.
या मार्गावर भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अंजी खड आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पूल (Chenab) आहे. दरम्यान, वंदे भारत रेल्वे आज जगातील या सर्वात उंच रेल्वे पूल चिनाबवरून धावली. वंदे भारत रेल्वेच्या या अद्भुत प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे.
चिनाब रेल्वे पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान आहे. हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून तो जगातील सर्वात उंच कमानी पूलदेखील आहे. तो २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
काश्मीर खोऱ्यातील थंड हवामान लक्षात घेऊन या रेल्वेमध्ये बदल करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. २३ जानेवारी रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, अनेक देशांनी भारतातून सेमी-हायस्पीड वंदे भारत रेल्वेच्या आयातीची इच्छा दर्शवली आहे. “अनेक देशांनी वंदे भारत रेल्वेसाठी रस दाखवला आहे,असे वैष्णव यांनी ANI शी बोलताना सांगितले.
उणे ३० अंश तापमानातही वेगाने धावते
पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यावेळी ती ताशी १६० किलोमीटर वेगाने धावली होती. याची खास गोष्ट म्हणजे वंदे भारतच्या काचेवर कधीही बर्फ जमा होऊ शकत नाही. ती उणे ३० अंश तापमानातही वेगाने धावते. याशिवाय, त्यात विमानासारखे फीचर्सदेखील जोडण्यात आली आहेत.
नवी दिल्लीहून निघालेली अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली वंदे भारत रेल्वे शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ वाजता श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. आठ कोच असलेल्या या वंदे भारतची चाचणी शनिवारी कटरा आणि बडगाम रेल्वे स्थानकादरम्यान घेण्यात आली. ही रेल्वे कटरा येथून सकाळी ८ वाजता निघाली.