
म्हणाले, मी दादांची भेट घेणार…
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरु आहे. याच प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे.
विशेष म्हणजे तर या सगळ्या घटनेचा तपास हायकोर्टाचे न्यायाधीश स्वतंत्रपणे करणार आहेत.
खून आणि खंडणी प्रकरणातले आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तपास यंत्रणेवर त्यांच्यामुळे दबाव येऊ शकतो, अशी भीती सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनी व्यक्त केली आहे. तशा काही घटनादेखील मागच्या काही दिवसांपासून पुढे येत आहेत.
एकीकडे स्वपक्षातील लोक, महायुतीचे लोक आणि विरोधक धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताना आता पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातले एक आमदार धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलले आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण आहे, असं ते म्हणाले आहेत. बीडमधल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबचं विधान केलं आहे.
काय म्हणाले विजयसिंह पंडित?
मस्साजोगची घटना दुर्दैवीआहे. अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण असं असताना दुसरीकडे बीडची बदनामी होता कामा नये. बीडचा बिहार होतोय, असं म्हणणं चूक आहे. मुंबई-पुण्याचे लोक बीडचा माणूस म्हटलं तर खालीवर बघतात.. अशी प्रतिमा करणं चूक आहे. सुरेश धस यांचं नाव न घेता विजयसिंह पंडित बोलत होते.
आंतरवाली येथे माध्यमांशी बोलताना पंडित म्हणाले की, मी याप्रकरणी अजितदादांची भेट घेणार आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा विषय राजकीय आहे. वरिष्ठ पातळीवरचे लोक त्याबाबतचा निर्णय घेतील. संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला पकडलं नाही तर मी याबाबत सरकारला जाब विचारेन.
दरम्यान, बीडमधून पहिल्यांदाच एक आमदार मंत्री धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलल्याचं दिसतंय. विजयसिंह पंडित हे गेवराईचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याच पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा झाला पाहिजे, असं म्हटलंय. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.