
बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांची मालिका कायम सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचे वेगवेळे कारनामे समोर येत असतानाच आणखी एका घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहे.
काल वाल्मिकच्या बातम्या का पाहतोय म्हणत एका तरूणाला मारल्याची घटना समोर आली होती. या घटनेत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच तुझाही संतोष देशमुख करू अशी धमकीही या तरूणांनी दिली होती.
वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोय असं म्हणत कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराडच्या समर्थक तरूणाने ज्या तरूणाला मारहाण केली. तो तरूण स्वत: होमगार्ड आहे. पोलिसांसोबत काम करणाऱ्या होमगार्डलाच जर अशी मारहाण होत असेल, तर मग सामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान, वैजनाथ बांगर(21) आणि अभिषेक सानप (19) ही मारहाण करणाऱ्या तरूणांची नावं आहेत. मारहाण प्रकरणातील फिर्यादी अशोक मोहिते होमगार्डचे काम करत होता. त्या दरम्यान त्यांनी या दोघांना मारलं होतं. हाच राग मनात धरून या दोघा मुलांनी त्याला मारलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, अशोक मोहिते याच्या जबाबानंतर पोलीस अधीक्षक सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत.
तुझाही संतोष देशमुख करू
अशोक शंकर मोहिते आपल्या मोबाइलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघं तिथे आले आणि त्यांनी थेट अशोकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दोघांनी ‘आमच्या बातम्या का पाहतोस.. लय माजलेत यांच्याकडे बघावे लागेल..’ असं म्हणत थेट अशोकला लाथा बुक्क्याने मारहाण केली.
‘तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू.’ अशी धमकी या दोघांनी दिल्याचा आता आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीतील आरोपी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळे या मुख्य आरोपीचे मित्र असल्याचे समजते आहे. कारण त्यांनी कृष्णा आंधळे याच्या समर्थनार्थ WhatsApp वर स्टेट्स देखील ठेवले आहे.