
आयसीसीची मोठी घोषणा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. मात्र साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 23 फेब्रुवारीकडे लागून आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये महामुकाबला होणार आहे. मात्र त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या 2 खेळाडूंमध्ये विजयासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. आयसीसीने गुरुवारी 6 फेब्रुवारीला जानेवारी महिन्यातील ‘बेस्ट प्लेअर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले. या नामांकित खेळाडूंमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि विंडिजच्या प्रत्येकी 1-1 खेळाडूचा समावेश आहे.
आयसीसी दर महिन्यात प्लेअर द मन्थ पुरस्कारासाठी नामाकंन जाहीर करते. त्यानंतर तिघांपैकी एका खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. आयसीसी एका महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर 3 खेळाडूंची निवड करते आणि त्यांना पुरस्कारासाठी नामांकन देते. त्यानंतर क्रिकेट चाहते तिघांपैकी आपल्या आवडत्या खेळाडूला मत देऊन पुरस्कार मिळवून देण्यासाठी मदत करतात. तर आयसीसीची संबंधित समिती 3 खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा करुन एका खेळाडूला हा पुरस्कार जाहीर करते.
3 खेळाडू कोण?
आयसीसीने या पुरस्कारासाठी पाकिस्तानच्या नोमान अली, विंडीजच्या जॉमेल वॉरिकन आणि टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती या तिघांना नामांकन दिलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन तिघांना नामांकन मिळाल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
वरुण चक्रवर्तीची कामगिरी
वरुण चक्रवर्ती याने ऑक्टोबर 2024 साली टीम इंडियात कमबॅक केलं. वरुणने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी 20i मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. वरुण या मालिकेतील 5 पैकी 4 सामने खेळला. वरुणने या 4 सामन्यांमध्ये एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
नोमानची कामगिरी
तसेच पाकिस्तानच्या नोमान अली याने विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण 16 विकेट्स घेतल्या. नोमानने पहिल्या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नोमानने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात हॅटट्रिकसह 6 विकेट्स घेतल्या. तर विंडीजचा वेगवान गोलंदाज जॉमेल वॉरिकन याने पाकिस्तानविरुद्ध 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे जॉमेलला हा पुरस्कार मिळेल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी नोमान आणि वरुण अर्थात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असाच हा सामना रंगणार आहे. आता आयसीसी या दोघांपैकी कोणाला सर्वोत्तम ठरवते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.