
महाराष्ट्राचे सुपूत्र आणि बिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात. शिवदीप लांडे नेहमीच फेसबुकवर त्यांच्या भावना शेअर करत असतात. राजीनामा मंजूर झाल्यानंतर शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये शिवदीप लांडे यांनी त्यांच्या वर्दीचा फोटो शेअर केला आहे, त्याचसोबत त्यांनी करिअरबद्दलची भावनाही व्यक्त केली आहे. शिवदीप लांडेंच्या या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.
शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘तो सुगंध आहे, हवेत मिसळून जाईल. वर्दी एका तरुणाचं स्वप्न असतं, पण तिची सतत आणि समर्पित सेवा केल्यानंतर आपली कातडीच वर्दी होते. आता सर्वसामान्यांसोबत जोडलं जाण्यासाठी युनिफॉर्मची गरज नाही. नोकरीच्या पुढे जाऊन बिहारच्या हवेला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. कहाणीचा एक अंक संपला आहे आणि दुसऱ्याची सुरूवात झाली आहे.
शिवदीप लांडेंना बिहारसाठी खास लगाव
शिवदीप लांडे यांना बिहारसाठी खास लगाव आहे, हे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. पण शिवदीप लांडे बिहारसाठी नेमकं काय करणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी एक आठवड्यापूर्वीही शिवदीप लांडे यांनी एक पोस्ट केली होती. लवकरच तुमच्यामध्ये येत आहे, असं शिवदीप लांडे म्हणाले होते.
राजकारणात प्रवेश करणार?
राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे बिहारमध्ये निवडणूक लढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. यावर्षाच्या शेवटी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवदीप लांडे यांना काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश करणार का? असं विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी याचं खंडन करत राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं.