
नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू
नाशिकच्या सिडको परिसरात एका 5 वर्षीय चिमुकल्याला कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमधील हा प्रकार घडला आहे.
ध्रुव अजित राजपूत (5 वर्ष) असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. वडिलांचे मोबाईलमध्ये लक्ष असताना ही घटना घडल्याचे बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. ध्रुव अजित राजपूत (5) हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात होता. त्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला घेऊन हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांचं खेळून झाल्यानंतर ते पुन्हा त्या दोघांना घरी घेऊन जात होते. त्याचवेळी अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. तेवढ्याच ध्रुव हा वडिलांचा हात सोडून लॉबी धावत आला. त्याचवेळी एका ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
यात ध्रुव हा पळत येताना दिसत आहे. त्याने गाडी दिसल्यानंतर स्वत:ला थांबण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो घसरला आणि गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला. ते चाक त्याच्या अंगावरुन गेलं. मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात येताच अजित यांना धक्काच बसला. त्यांना मुलाला उचलले. ध्रुव हा निपचित पडल्याचे पाहून अजित यांनी कार चालकाला मारहाण केली.
यानंतर ध्रुवला गंभीर दुखापत झाली. त्याला त्याच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.