
सत्य समोर येताच पोलीस देखील हादरले !
शुभम उर्फ पुष्पांशू मदन हा बारबालांवर 500 रुपयांच्या नोटा उडवत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. शुभमकडे पोलिसांना 2 लाख रुपयांच्या नोटा सापडल्या, पण या नोटा पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण या सगळ्या नोटा नकली होत्या.
शुभमकडे सापडलेल्या या नोटांमुळे नागूपरमधलं बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त झालं आहे. मूळचा जबलपूरचा असलेला शुभम हा इंदूरच्या बारमध्ये बारबालांवर हे पैसे उडवत होता.
पोलिसांनी अटक केल्यानंतर शुभमने या नोटा नसरुल्लागंजच्या महिपाल उर्फ मोहित बेडाकडून विकत घेतल्याचं सांगितलं. शुभमच्या सांगण्यावरून मध्य प्रदेश पोलिसांनी मोहित बेडाला ताब्यात घेतलं. तेव्हा मोहित बेडाने नागपूरमधील विर्क बंधूंची नावं घेतली. यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी जरीपटका भागातील बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या कारखान्यात मध्य प्रदेश पोलिसांना मोठ्या प्रमाणवर बनावट नोटा आढळून आल्या.
नागपूरच्या जरीपटका भागातील चॉक्स कॉलनीमध्ये हा बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू होता. या कारखान्यातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापल्या गेल्या, तसंच देशभरात 10 ते 15 राज्यात या नोटा पाठवल्या गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरमधून मलकीत सिंग गुरमेश सिंग विर्क आणि मनप्रीतसिंग कुलविंदरसिंग विर्क या दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. यासह टोळीतील 4 जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्यासाठी मलकितसिंग विर्क आणि मनप्रीतसिंग विर्क यांनी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. कारखान्यातून त्यांनी 200 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटा त्यांनी सगळ्यात आधी नागपुरातील बाजारात आणल्या. यानंतर त्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, गोवा, केरळ, पंजाब या राज्यांमध्ये त्यांनी बनावट नोटा पाठवायला सुरूवात केली. या नोटांबाबत कुठूनही तक्रार येत नसल्यामुळे विर्क बंधूंनी दिवस रात्र कोट्यवधींच्या नोटांची छपाई सुरू केली, पण बारबालांवर उडवलेल्या पैशांमुळे विर्क बंधूंचं बिंग फुटलं.
1 लाख रुपयांच्या खोट्या नोटा छापण्यासाठी विर्क बंधू 20 ते 30 हजार रुपये घेत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मलकितसिंग विर्क, मनप्रीतसिंग विर्क, महिपाल बेडा, अनुराग धरम सिंग चौहान, मोहसिन नासीर खान, शुभम या सहा जणांना अटक केली आहे. तसंच नागपूरच्या कारखान्यातून पोलिसांनी 2 लाखांच्या बनावट नोटा, तीन लेझर प्रिंटर, 200 आणि 500 च्या नोटा छापण्यासाठी ए-4 साईजचे 85 जीएसएम पेपर, दोन लॅमिनेशन मशीन, आरबीआयची सिक्युरिटी स्ट्रीप, लॅपटॉप जप्त केला आहे.