
आकाच्या आकाची नार्को करा !
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
त्याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून एका तरुणाला मारहाण झाली होती. या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी थेट कर्नाटकातून अटक केली. अशोक मोहिते मारहाण प्रकरणात पकडलेले आरोपी फरार कृष्णा आंधळेचेच मित्र आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
सुरेश धस पुढे म्हणाले, अशोक मोहितेंवर ज्यांनी वार केला.. संतोष देशमुख यांचे व्हिडिओ का पाहतो, मृत सरपंचाच्या पोस्ट का टाकतोस म्हणून अशोक मोहितेला मारहाण झाली. आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजेत असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. मी सर्व कागदपत्रे गोळा करत आहे. यात एसआयटीला आम्ही बरीच कागजपत्रे देणार आहोत. आरोपीला अटक झालीच पाहिजे. वेळ पडली तर नार्को टेस्ट देखील झाली पाहिजे. या सगळ्यात आकाचा आका आला तर त्याची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.