
वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राम मंदिरासाठी लढा देणारे आणि अयोद्धेतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी सत्येंद्र दास यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील आठवड्यात म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत लखनऊ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 1993 पासून सत्येंद्र दास राम मंदिराची सेवा करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.
सत्येंद्र दास मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होते. लखनऊच्या पीजीआयमधून त्याचं पार्थिव शरीर अयोध्येला आणलं जात आहे. सत्येंद्र कुमार दासजी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांच्या शोकाकुल शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी, असं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.
कोण होते सत्येंद्र कुमार दास?
1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, 1976 मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर 1992 मध्ये जेव्हा त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा 100 रुपये पगार मिळत होता. 2018 पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त 12 हजार रुपये दरमहा होता.
दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित इतर लोकांनी मुख्य पुजाऱ्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.