
देश सोडून पळालेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वक्तव्य
बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार कार्यरत आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना विद्यार्थी आंदोलन व हिंसाचारानंतर देश सोडावा लागला होता.
मात्र, शेख हसीना या वेळोवेळी ऑनलाइन माध्यमातून आवामी लीगच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. आता त्यांनी युनूस यांच्या सरकारला ‘दहशतवादी’ म्हटले आहे. देशात झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
हसीना यांनी नुकतेच झूमच्या माध्यमातून काही विधवा महिला आणि त्यांच्या मुलांशी संवाद साधला. ही व्हर्च्युअल बैठक आवामी लीगचे अध्यक्ष नजरुल इस्लाम यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यूनुस यांनी बांगलादेशला दहशतवादाचे केंद्र बनवले आहे. तसेच, त्यांना कोणताही अनुभव नसल्याने त्यांनी सरकार चालवू नये, असे हसीना यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, नोबेल पुरस्कार विजेत्याने स्वतः कबूल केले आहे की त्यांना देश चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी सरकार चालवण्यापासून दूर राहावे. याशिवाय, विद्यार्थी आंदोलनात अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही ते गप्प राहिले आणि देशात अराजकता पसरू दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी सर्व चौकशी समित्या बरखास्त केल्या आहे. दहशतवाद्यांना लोकांची हत्या करण्यासाठी मोकळे सोडले. ते बांगलादेश उद्ध्वस्त करत आहेत. या दहशतवादी सरकारला सत्तेतून बाहेर फेकू. असे शेख हसीना यावेळी बोलताना म्हणाल्या.
5 ऑगस्टला लोकांच्या तावडीतून वाचून स्वतःची सुटका केली, जेणेकरून पुन्हा एकदा बांगलादेशच्या नागरिकांची सेवा करता येईल, असेही त्या म्हणाल्या. तसेच, ‘मी परत येईन आणि आपल्या पोलिसांच्या हत्येचा बदला घेईन. मी सर्वांना संयम राखण्याची आणि एकजुट राहण्याची विनंती करते. मी पुन्हा येईन, आपल्या शहीदांचा बदला घेईन. मी पूर्वीप्रमाणेच न्याय देईन. तुम्हाला माझं शब्द आहे., असे आश्वासन देखील त्यांनी आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना दिले
दरम्यान, बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी आरक्षणासंदर्भातल्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता.