
शिवसेना फुटीवर आमदार हेमंत पाटलांची कबुली, उद्धव ठाकरेंवर थेट टीका…
पहिल्या शिवसेनेमध्ये शिवसैनिकांना तेंव्हाच्या संपर्क मंत्र्यांनी दरवाजे बंद केले होते. शिवाय कोरोनाच्या काळातही त्या मुख्यमंत्र्यांनी आमचा एक्सेस ठेवला नव्हता. म्हणुन ज्या लोकांशी बांधिलकी आहे त्यांना काय उत्तर द्यायचे?
असा प्रश्न आम्हाला पडला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी क्रांती केली असल्याचं विधान एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी केलंय. ते परभणीत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट टीका करत लक्ष्य केलंय.
परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात आज (2 मार्च) एकनाथ शिंदेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. हेमंत पाटील यांनी यावेळी बोलताना पहिल्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत किती फरक आहे हे सांगितले. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करावा असे आवाहनही केले आहे.
ठाण्यात माजी नगरसेविकेचा भाजपामध्ये प्रवेश, उबाठा गटाला धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज (2 मार्च) प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उबाठा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केला असतानाच, भाजपाने दुपारीच उबाठा गटाला धक्का दिला.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र.5 मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटाबरोबर राहणे पसंत केले होते. तर त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होते.बैरीशेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओवळा-माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजपाप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी 2012 मध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता.
वर्तकनगर, शिवाईनगर, वसंत विहार परिसरात नगरसेवकपदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दांपत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून, भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कार्य करणार असल्याचे भास्कर बैरीशेट्टी यांनी भावना व्यक्त केल्या.