
काँग्रेस नेत्यानं कॅप्टन रोहित शर्माला ‘लठ्ठ’ म्हणत केली ‘मठ्ठ’ कमेंट…
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी सुरूच आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र काँग्रेसच्या एका महिला नेत्याने रोहित शर्माच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित शर्माला लठ्ठ म्हणत काँग्रेस नेत्याने तो प्रभावहीन असल्याचे म्हटलं. त्यानंतर आता भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माविरोधात वादग्रस्त विधान केलं. शमा मोहम्मद यांनी रोहितला लठ्ठ म्हटलं आहे. याशिवाय त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहितला भारतीय इतिहासातील सर्वात अप्रभावी कर्णधार म्हटलं. यानंतर भाजप नेते आणि क्रिकेट चाहत्यांकडून शमा यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र यावर उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली आणि कपिल देव यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत रोहितच्या कामगिरीवर बोललो असल्याचे म्हटलं.
दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना सुरु असताना शमा मोहम्मद यांनी एक्स पोस्टवरुन रोहितवर निशाणा साधला. “खेळाडू म्हणून रोहित शर्मा लठ्ठ आहे आणि नक्कीच भारताचा सर्वात अप्रभावी कर्णधारही देखील, त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. त्याच्या आधी आलेल्या गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि इतरांच्या तुलनेत त्याच्यात जागतिक दर्जा काय आहे. तो एक सामान्य कर्णधार आणि एक सामान्य खेळाडू आहे ज्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली, असं शमा मोहम्मद यांनी म्हटलं.
भाजपने शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या भाजप नेत्या राधिका खेरा यांनी शमा यांचा पक्ष अनेक दशकांपासून खेळाडूंचा अपमान करत आल्याचा आरोप केला.ही तीच काँग्रेस आहे जी दशकांपासून खेळाडूंचा अपमान करत होती. आता एका क्रिकेट दिग्गजाची थट्टा करण्याचे धाडस करत आहे. घराणेशाहीवर भर देणारा पक्ष स्वतःच्या मेहनतीने बनवलेल्या चॅम्पियनला शिकवत? असं खेरा म्हणाल्या.