
नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. करण आधी रोहित पवार यांनी तशा आशयाचं ट्विट केलं आणि त्यानंतर रोहित पवार यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना याला दुजोरा दिला.
पक्षात मोठा निर्णय होणार असेल म्हणून आपला निर्णय मागे ठेवला असेल असं वक्तव्यही त्यांनी केलं. मात्र त्यांचा रोख कुणाकडे याची चर्चा आता रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली. आपल्याला पक्षातील कामात संधी मिळत नाही कारण अजूनही आपण कुठेतरी कमी पडत असेल असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडे अंगुली निर्देश केले आहेत.
रोहित पवार यांनी अशा प्रकारे टीका ही आताच केली आहे असं नाही. दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी कुटुंबासोबत छावा सिनेमा पहिला. चित्रपटातून आपण काय शिकलो हे सांगताना शत्रू हा उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या व्यक्तींपासून सावध राहण गरजेचं आहे अस म्हटलं होतं.
रोहित पवारांचे ट्वीट काय होतं?
मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोहचवली, हेही पाहण्याची गरज आहे. लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो.
रोहित पवार यांच्या ट्विट मागे असा संदर्भ दिला जातोय की मागील आठवड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी बैठक पार पडली त्या बैठकीत रोहित पवार यांना पक्षांतर्गत काम करण्यासाठी एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. या बैठकीला ना रोहित पवार उपस्थित होते ना त्यांना कोणती मोठी जबाबदारी देण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या रोहित पवार यांची पक्षातील नेत्यांवर नाराजी आहे. रोहित पवार यांना पक्षांतर्गत कामकाजासाठी संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षात चांगली संधी देण्यात आली.
एकंदरीतच पक्षात सातत्याने डावलंल जात असल्याने रोहित पवार यांनी आपल्या मनातील खदखद आज विधान भवनात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसेच भविष्यात कदाचित पक्षातील एखादी मोठी जबाबदारी मला मिळणार असावी म्हणून पक्षाच्या नेत्यांनी सध्या तरी मला जबाबदारी देणं टाळलं असावं अशी कोपरखळी मारली.