
दै.चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड –
मानवी जीवन अत्तराने नाही तर सुसंस्काराने सुगंधित बनते आणि सुसंस्कार हे संतांच्या सानिध्यातून मिळतात म्हणून नेहमी माणसांनी साधू संतांची संगती करावी असे विचार परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी मौजे हाळदा येथील संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेतून बोलताना व्यक्त केले. कथेतील दुसऱ्या दिवशी उपस्थित श्रोते मंडळींना मार्गदर्शन करते वेळेस त्यांनी अत्यंत मोलाचे विचार सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की माणसाच्या जीवनात संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत संस्कार नसतील तर माणूस पशु समान जीवन जगतो. म्हणून आई-वडिलांनी लहानपणापासूनच आपल्या मुलाबाळावर चांगले संस्कार करावेत. तसेच त्यांना शूरवीरांच्या, महापुरुषांच्या कथा सांगून त्यांची मने सुदृढ बनवावीत. गावातील आयोजित सप्ताहातून श्रीमद् भागवत कथा, शिव कथा, राम कथा, श्रीमद् देवी भागवत कथा महापुराण व अनेक ग्रंथाचे पारायण हे मानवी मनाला सुसंस्कारित करण्यासाठीच सांगितल्या जातात तेव्हा सर्वांनी या ज्ञान अमृतात तल्लीन होऊन आपले जीवन सुसंस्कारी बनवावे असे सांगितले.
भगवंतांनी आपणाला हा अत्यंत पवित्र मानवी देह दिला आहे तेव्हा त्याला विविध व्यसनाच्या आहारी जाऊ न देता स्वच्छ ठेवावे. गळ्यात तुळशीची माळ धारण करावी, प्रभुचे चिंतन करीत जावे, पोषणयुक्त शाकाआहार विहार ठेवावा. तसेच लवकर झोपावे लवकर उठावे सर्व गोष्टी मर्यादित ठेवाव्यात असे सांगितले. ” युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टसे कर्मसु ” हा गीतेचा सिद्धांत पटवून सांगितला. लवकर झोपे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे हा सिद्धांत ही विविध दृष्टांत देऊन पटवून सांगितला व जीवनात राग आणि द्वेष बाजूला सारून विवेकाने जीवन जगावे हाच खरा या श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचा संदेश आहे असे सांगितले. त्यांच्या रसाळ वाणीतून होत असलेल्या अर्थपूर्ण कथेचा लाभ गावातील व परिसरातील शेकडो भाविक भक्त व माता-भगिनी मोठ्या संख्येने घेत आहेत.