
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : मार्चच्या मध्यातच शिरूर तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच यंदा उकाडा जाणवू लागला आहे. उन्हामुळे सकाळच्या सत्रात कामे उरकून घेण्याकडे बळीराजाचा कल वाढला आहे.नेहमी वर्दळीचे असलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत. दुपारच्या सत्रात तर रस्त्यावर शुकशुकाट पाहयला मिळत आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात तीव्रता अधिक वाढणार असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना करत आहेत. नेहमी वर्दळ असणार्या रस्त्यावर सकाळी 11 नंतर शुकशुकाट होत आहे.
कोरोना काळात रस्ते निर्मनुष्य झाले होते, त्याच पध्दतीने दुपारच्या सत्रात रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत आहे. यात्रा-जत्रांचा हंगाम तोंडावर असतानाच वाढलेल्या उन्हामुळे यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रविवारी शिरूरचे तापमान तब्बल ३९ अंश सेल्सिअसवर गेले होते.
कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजूर गावाकडे गेल्यानंतर वाहनांची संख्या आणि मजुरांची संख्याही कमी होणार असल्याने नेहमी वर्दळ असलेल्या भागात शांतता पसरणार आहे. सर्वच शाळांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात असल्याने विद्यार्थीही दुपारी रस्त्यावर अथवा घराबाहेर दिसत नाहीत. उन्हामुळे थंड पदार्थांना मागणी वाढली आहे. नेहमी गजबजलेल्या चौकात शुकशुकाट आहे.