
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
धानिवरी गावातील पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत मंजूर झालेल्या पाच रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 10 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन ही रस्त्यांचे अत्यंत हलक्या दर्जाचे काम झाले असून, त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराचे लायसन्स रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित ठेकेदाराने यापूर्वीही गावातील एका अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते. ग्रामपंचायतीने यासंदर्भात ठेकेदाराला जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी त्याच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच शैलेश कोरडा यांनी केला आहे. प्रशासनाने त्वरीत दखल न घेतल्यास, पीडब्ल्यूडी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोटबीपाडा अंगणवाडी ते सुरेश सपाटे यांचे घर, गेठीपाडा ते मदन कान्हात यांचे घर आणि जांबिपाडा तसेच कडूपाडा या भागांतील रस्त्यांवर अत्यंत सुमार दर्जाचे काम झाले आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण सहज उखडत असून, खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. इतक्या मोठ्या निधीतून काम पूर्ण करूनही रस्त्यांची ही दयनीय अवस्था म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
संपूर्ण गावाचे आता लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा ठाम इशारा दिला गेला आहे.