
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी – किशोर फड
बीड/अंबाजोगाई
उपस्थितांच्या मनोरंजनासाठी विविध सोहळ्यात सांगितिक मैफील अत्यावश्यक झाली आहे. याच मालिकेत रौप्यमहोत्सवी “स्वररत्न”चा निर्माता आणि आपल्या अभिजात व सुरेल गायकीने उभ्या महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध व चिंब करणारा महागायक सुभाष शेप अनेकानेक कारणास्तव आघाडीवीर आणि वैशिष्ट्यपुर्ण ठरतो. रौप्यमहोत्सवी “स्वररत्न” या सांगितिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन सुभाष नाती, माती व माणसं जोडण्याची किमया साधतो, म्हणुन तो संगित क्षेत्रातला “किमयागार” कलावंत ठरत आहे. लग्न, मेळावे, सभा, साखरपुडा, वाढदिवस, सण-उत्सव, प्रासंगिक कार्यक्रमात अंतर्मनाचा व काळजाचा ठाव घेणारी सुभाषची गीते ऐकुन श्रोत्यांचे कान तृप्त होताना आपण पाहिले आहे. अर्थात संगित मैफिलीतुन सुभाष मनोरंजन करत नाही तर “दिवस बदलण्याची ताकत व क्षमता आपल्यात आहे,” असे सुविचार पेरतो म्हणुन तो सांस्कृतिक क्षेत्रातला प्रबोधनकारसुध्दा ठरतो. कोणत्याही सोहळ्यात संगित व सुत्रसंचलन असे दोन भाग असतात, सुभाष दोन्ही भुमिका लिलया पेलणारा “कॉम्बोपॅक” आहे. अर्थात केवळ सोहळ्यात गायकी व निवेदन करत असल्याने सुभाष कॉम्बोपॅक ठरत नाही तर त्याने समाजकारण, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रासह सांस्कृतिक उपक्रमांची मनोभावे सेवा केली असल्याने सुभाष चतुरस्त्र किंवा अष्टपैलु व्यक्तिमत्व ठरतो. गाणी सादर करताना क्रमबध्द, संदर्भप्रचुर व सुश्राव्य निवेदनातुन विचारांसह संस्कृतीचे संवर्धन करणारा सुभाष खऱ्या अर्थाने संस्कृतीचा दुत किंवा सारथी ठरत आहे. सुभाषच्या संपर्कासह ओळखीचे नेटवर्क कमालीचे समृध्द असल्याने मैफिलित उपस्थित उपस्थितांचा गुणवैशिष्ट्यासह उल्लेख करतो तेंव्हा “तो मान्यवर” स्वत:ला कृतार्थ समजतो. प्रत्येक मैफलीत उपस्थित रसिकश्रोत्यांना सुभाष नावांसह ओळखत असल्याने सुभाषची स्मरणशक्ती पाहुन प्रेक्षक थक्क होतात. प्रेक्षकश्रोत्याच्या आवडीची नाडी ओळखणारा सुभाष भावगीते, युगलगीते, देशभक्तीपर गीतांसोबत “आईवडील, शेतकरी व निसर्गगीते” सादर करतो तेंव्हा कार्यक्रमाची रंगत सर्वोच्य शिखरावर जात असल्याचा अनुभव येतो. सुभाषच्या भावुक आवाजातील हरकत, आलाप, सुर व नजाकत भाव खावुन तर जातेच, सोबतच गीतांच्या बोलाप्रमाणे हातवारे, हावभाव व देहबोली संगित मैफिलीची उंची वाढवते. रसिकप्रेक्षकांकडुन मिळणारी टाळ्यांची दाद हीच सुभाषची प्रॉपर्टी असल्याचे दिसुन येते. सुभाषची करुण, हळुवार व भावस्पर्शी आवाजातील कांही गाणी ऐकताना तो मुकवेदनेचा आवाज प्रस्तुत करतोय, असे वाटते. जन्मदिवस, पुरस्कार, लग्नसोहळे किंवा कर्तबगारीबद्दल स्वकीयांना परिचयासह शुभेच्छा, संगित मैफिलीचे फोटो-रेकॉर्डींग आणि वॉलवर मराठी-हिंदी सुवचनांचे लेखन यावरुन सुभाष सोशल मिडीयात कमालीचा सक्रीय असल्याचे दिसुन येते. सर्वदुर नातलगांचा गोतावळा असणारा सुभाष धर्मापुरीचा भाच्चा आहे, हे सविशेेष. कार्यक्रम आठवत नाही, मात्र राष्ट्रीय नेते श्रध्देय गोपीनाथराव मुंडे साहेबांची “उतणार नाही, मातणार नाही” ही वाक्य सेम टु सेम आवाजात सुभाषकडुन ऐकली तेंव्हा साक्षात साहेब बोलत असल्याचा भास उपस्थितांना झाला होता. विषम व प्रतिकुल परिस्थितीचा सामना करणाऱ्या सुभाषचा करियर प्रवास संघर्षमय आहे, याचे आपण साक्षीदार आहोत. तब्बल तीन दशकापासुन संगितक्षेत्राची मन:स्वी सेवा करणारा सुभाष अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला असुन आघाडीचे दैनिक मराठवाडा साथीने “महाराष्ट्राचा महागायक” शिर्षकाखाली पुरवणी प्रकाशित केल्याचे सर्वज्ञात आहे. वक्तृत्वावर प्रभुत्व असणाऱ्या सुभाषच्या बहुअंगी, बहुरंगी व बहुविध भुमिका नटसम्राटाला लाजवेल अशा असतात, याचा अनुभव सार्वत्रिक आहे. रसिकप्रिय, सुरेल, प्रज्ञावंत, गुणवंत, अभिजात, यशवंत व प्रतिभावंत सुभाष महाराष्ट्रभरातील सोहळे जिंकतोय, याचा सकल संगितप्रेमींना सार्थ अभिमान आहे. विनयशिल, हळवा, सुशिल, उत्साही उर्जावाण, मित्रप्रिय व संवादतज्ञ असणाऱ्या सुभाषच्या सादरीकरणातील सहजता रसिकमनावर भुरळ पाडते, हे सर्वश्रुत आहे. आपल्या मधुर, सुस्वर व श्रवणीय गायकीने रसिकश्रोत्यांना “जग विसरायला” लावणाऱ्या कलाश्रयी व वलयांकित सुभाष शेप यांच्या संगितसेवेला सद्भावनेसह दि.ना.फड यांनी शुभेच्छा दिल्या.