
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी उमरगा -शिवराज पाटील
उमरगा – महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने युवा भारुडकार कृष्णाई उळेकर यांच्या ‘रंग भारुडाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात रविवार, 23 मार्च रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धनराज चौगुले, डॉ. दीपक पोफळे, डॉ. उदय मोरे, सिद्रामप्पा चिंचोळे, नितीन होळे, बाबा जाफरी, दीपाली स्वामी, सुलक्षणाताई शिंदे, उषाताई गायकवाड, सरिता उपासे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार साहेब आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले उपस्थित होते.
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारुडाच्या रंगतदार सादरीकरणाचा आनंद घेतला. युवा भारुडकार कृष्णाई उळेकर यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून लोकसंस्कृती, सामाजिक संदेश आणि मनोरंजन यांचा उत्तम मिलाफ साधत उपस्थितांची मने जिंकली.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ‘रंग भारुडाचे’ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळाने विशेष मेहनत घेतली.