
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांच्या सीमारेषेवर वसलेले उदगीर आता “अवैध धंद्यांची राजधानी” बनत चालले आहे. साखर कारखाने, मटका, बेकायदेशीर दारू विक्री आणि आता वाळू माफियांचा अंमल वाढत चालल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेळोवेळी अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या असताना, स्थानिक पातळीवरील महसूल प्रशासन व पोलिसांची भूमिकाच संशयास्पद ठरत आहे. दि. 11 मार्च रोजी पहाटे शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
पोलिसांची कारवाई की महसूल विभागाची माफियांना मदत?
पोलिसांनी एमएच 26 बीडब्ल्यू 4949 क्रमांकाची गाडी अवैध वाळू वाहतूक करताना पकडली. पहाटे 4 वाजता उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये ती ताब्यात घेण्यात आली. परंतु काही तासांतच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने गाडी सोडून देण्यात आली!
सहसा अशा गाड्यांचा पंचनामा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर केला जातो. काही वेळा आठवडाभर गाड्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात ठेवून मोठा दंड आकारला जातो. मग या प्रकरणात महसूल विभागाने एवढी तातडीने गाडी का सोडली? कुणाच्या दबावाखाली?
पोलीस-महसूल प्रशासनात समन्वयाचा अभाव की संगनमत?
पोलीस प्रशासनाने केलेली कायदेशीर कारवाई महसूल विभागाने झुगारली.
अवैध वाहतूक करणारी गाडी महसूलच्या आदेशावरून त्वरित सोडली गेली.
कोणता अधिकारी जबाबदार? महसूल विभागाला एवढी घाई का होती?
या सर्व प्रश्नांची उत्तरे महसूल प्रशासन देईल का, की हे प्रकरण अशीच दडपली जातील?
बिना नंबरच्या गाड्यांचा उदगीरमध्ये मुक्त संचार – प्रशासन झोपले आहे का?
अवैध वाळू वाहतुकीसाठी बिना नंबरच्या हायवा गाड्यांचा सर्रास वापर केला जातो.
अशा गाड्या भरधाव वेगाने चालवल्या जातात.
पोलिस आणि महसूल विभाग दोघेही याकडे दुर्लक्ष करतात.
एका गाडीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत पासिंग नंबर बदलून 5-6 गाड्या रस्त्यावर धावत असतात.
पत्रकारांच्या नावावर हप्ता वसुली – दलाल कोण ?
उदगीर परिसरात वाळू माफियांकडून पत्रकारांना गप्प बसवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची चर्चा आहे. काही मोजक्या पत्रकारांना दरमहा हप्ता मिळतो, तर काही दलाल पत्रकारांच्या नावावर पैसे उकळतात. हा हप्ता नेमका कोण घेतो? त्याचा फायदा कोणाला होतो? याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
__________________________________
राजकीय वरदहस्त – मोठ्या नेत्यांचे नाव पुढे येणार?
सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांचा या अवैध धंद्याला पाठिंबा असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही वाळू माफिया थेट स्थानिक राजकारण्यांच्या खांद्यावर हात ठेवून फिरत आहेत.
_____________________________
पुढील अंकात – गाड्या सडल्या, पण कारवाई नाही!
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन वर्षांपासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या सडत पडल्या आहेत, पण कुणी त्यांची चौकशी करीत नाही! महसूल विभाग डोळे झाकून आहे, तर काही पोलिसही सोयीनुसार गप्प आहेत.
हा मोठा घोटाळा आहे का त्यामागे कोणते चेहरे आहेत?पुढील अंकात मोठा गौप्यस्फोट! वाचत राहा…
__________________________________