
पन्हाळा येथील शिवस्मारकासाठी 10 कोटी रुपये मंजूर करून त्याचा जीआरही काढण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत विधान भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आ. चंद्रदीप नरके यांनी दिली.
यापूर्वी या शिवस्मारकासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 कोटी निधी मंजूर केला होता. त्यापैकी एक कोटी खर्च करण्यात आले होते. मात्र काम अपुरे राहिले होते. शिवस्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. नरके यंनी पत्राद्वारे केली होती. त्या जीआरची प्रत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नरके यांच्याकडे दिली.
नगरपरिषदांना विशेष अनुदान या योाजनेखाली पन्हाळा नगरपालिकेला हा 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून पन्हाळ्यातील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावाजवळील शिवस्मारकाजवळीत बगीचा, पदपथ व अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या खर्चाचा 100 टक्के हिस्सा उचलला आहे. जिल्हाधिकार्यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज आदी उपस्थित होते.