दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
भाग – ३
__________________________________
लातूर (उदगीर) : रखडलेल्या रस्ते आणि नालीच्या कामांमुळे उदगीर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उघडी पडलेली गटारे, अपूर्ण नाले आणि अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
निवेदन देऊनही निष्क्रिय प्रशासन
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात,
भगीरथ राजा नगर व परिसरातील नाली व रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत
दर्जेदार कामे होण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांकडून देखरेख ठेवण्यात यावी
अनियमितता आणि अपारदर्शकता दूर करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी
या मागण्या करण्यात आल्या आहेत.
अपघात आणि आरोग्याच्या धोक्याची जबाबदारी कोण घेणार?
या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे एखाद्या अपघाताची किंवा साथीच्या रोगांची साथ पसरल्यास जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरीक आता संतप्त होत असून, जर लवकरच कामे पूर्ण झाली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेवटी प्रश्न उरतोच – विकास की अर्थविकास ?
शहरातील नागरी सुविधांवर खर्च होतो, पण त्याचा नागरिकांना उपयोग होतो का? की हा पैसा ठेकेदार आणि राजकारण्यांच्या खिशात जातो? उदगीरमधील रखडलेली विकासकामे याच प्रश्नांची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने तत्काळ जबाबदारी स्वीकारून कामे पूर्ण करावीत, अन्यथा लोक आक्रमक पवित्रा घेतील, हे नक्की!
——————————————-