
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर )
देगलूर, ता. २७ मार्च – देगलूर-बिलोली एस.टी. आगारासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी २० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यासाठी आग्रही पाठपुरावा करणारे आमदार जितेश अंतापूरकर यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
संबंधित विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले असून, देगलूर आगारासाठी १० आणि बिलोली आगारासाठी १० अशा एकूण २० नवीन बसेस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. या निर्णयामुळे प्रवासाची गैरसोय दूर होईल आणि एस.टी. सेवेचा अधिक चांगला लाभ नागरिकांना मिळणार आहे.
मतदारसंघातील प्रवाशांना सुरक्षित आणि सुटसुटीत सेवा मिळावी, यासाठी आमदार अंतापूरकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, येत्या काही दिवसांत या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील.
प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार अंतापूरकर यांचे आभार मानले आहेत. नवीन बसेस उपलब्ध झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.