
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर)
निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक नेत्याला, पुढाऱ्याला आपला कार्यकर्ता आठवतो. कारण त्याच्या जीवावरच आपली पुढची पाच वर्षे त्याला काढायची असतात. आणि कार्यकर्ता हा नेत्यांचा शब्द कान टवकारुन ऐकत असतो.
आणि आपली स्वामिनिष्ठा दाखवतो. पण तरुण कार्यकर्त्यांनो, अशा निष्ठा दाखवण्यापेक्षा आपण नेत्याचा पगारी नोकर व्हा. त्यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून फुकट काम करण्यापेक्षा नोकरी मागा. म्हणजे तुमच्या कौटुंबिक उत्पादनातही वाढ होईल. तुमच्या नोकरीचाही प्रश्न सुटेल. आणि राज्यातली बेरोजगारीही कमी होईल.
तुमची गरज असेपर्यंत नेता तुम्हाला एकट्याला खाऊ, पिऊ घालतो. तुम्ही धाब्यावर मनसोक्त ताव मारता ? पण घरातल्या, कुटुंबातील सदस्यांचे काय? याचा विचार तुमच्या मनात येत नाही काय ? तुम्ही जे मिष्टान्न खाता ते त्यांच्या वाट्याला येतो का ? याचा विचार तुम्ही कधी करणार आहात ? कुटुंबातल्या सर्वांनाही खाऊ घालण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना? म्हणून तुम्ही फुव फुकट खाण्यापेक्षा नेत्याकडे नोकरी मागा. अन कार्यकर्ता म्हणून कामाला लागा. बघा नेता तुम्हाला नोकरी देतो का? देत नसेल तर लगेच तिथून निघा आणि आपापल्या शेतीच्या कामाला लागा.
निदान तिथं आई-वडिलांचे कष्ट तरी हलकी होईल. स्वतःचे उत्पन्न वाढेल. मग आपल्या पार्टीमध्ये घेण्यासाठी नेताच तुमच्याकडे विनवणी करेल. एवढी ताकद तुम्ही निर्माण करा आणि हे करता येत नसेल तर नेत्याकडेच नोकरी मागा आणि कार्यकर्ता म्हणून कामाला लागा. निवडणुका आल्या की पुढारी रंगात येतो आणि जिंकण्याचा वारा त्यांच्या अंगात संचारतं. तेव्हा त्याला हिरवा, निळा, भगवा कोणताही रंग चालतो. त्यांची अपेक्षा एकच असते आणि डोळ्यासमोर फक्त विजय दिसतो. जेव्हा ते तुमचा चेहरा रंगवतात आणि आपल्या पक्षात सप्तरंगी करून सोडतात.
तेव्हा तुम्हालाही आपला रंग कोणता हे राहत नाही लक्षात. प्रत्येक पुढारी पुढारी म्हणतो, तू आमच्याच भात्यात, फरक नाही यार तुझ्या माझ्या नात्यात…! आपलाचं कार्यकर्ता, सगळेच मानतात. माणूस भले कुणीही, रंग कोणता पाहतात. असं माहोल निवडणुकी पुरता असतो. त्याच्यानंतर तुमचाच नेता तुमचीच ओळख विसरतो. पाच वर्षे मात्र तो बिनधास्त राहतो. आणि तुम्ही पुन्हा बेरोजगारीचा सामना करता उत्पादनाचे साधन शोधता हाती काही लागत नाही आणि आपला नेता खूप मोठा माणूस म्हणून तुम्ही त्याला काही मागत नाही.
शिक्षण कमी असल्यामुळे चांगली (उच्च पदाची) नोकरी लागत नाही आणि घरची परिस्थिती बरी असल्यामुळे हलकी नोकरी करू वाटत नाही. त्यामुळे आपली अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होऊन जाते. ती होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनो नेत्याचा पगारी नोकर व्हा. तुमच्या जीवावर निवडून येऊन नेता कोट्यवधी कमावतो. कार्यकर्ता मात्र स्टेज, मंडप, हलगीवाल्यांची बिल देण्याकरिता बापजादयाची प्रॉपर्टी विकतो. लई चमचागिरी करणाराला नेता एखादं महामंडळ देतो. तुझ्या तू बघून घे. मला काय मागू नको, असं बजावून सांगतो.
साहेब, मालक, बापू, सर, अण्णा, तात्या, रावसाहेब, भाऊसाहेब, अण्णासाहेब यांच्या दावणीला बांधून घेतो. घरच्या कामाला वेळ नसतो. पण नेत्यासाठी तासनतास वाट बघत बसतो. दहावेळा फोन करून कुठवर आलात साहेब म्हणून विचारतो. पण कुटुंबातल्या सदस्यांना फोन करायला विसरतो. कुटुंबाच्या जीवावरच जगतो. पण त्यांचीच किंमत कमी करतो. साहेबापाशी लाळ घोटणार अन् कुटुंबात रुबाब मारणार, असं किती दिवस चालणार? त्यापेक्षा बाबा, आपल्या नेत्याचा पगारदार कार्यकर्ता हो अन् रुबाबात जीवन जग!