
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी –
नांदेड / उस्माननगर :- लोहा तालुक्यातील चिंचोली शिवारात पैशे देण्या-घेण्याच्या वादातून एका ऊस तोड मजूर तरुणाचा अत्यंत निर्दयीपणे गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करून निघृण खून करण्यात आला हि घटना दि. १ एप्रिल मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खून प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उस्माननगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे चिंचोली ता. लोहा येथे आपल्या नातेवाईकाकडे गेल्या चार दिवसांपासून मुक्कामी असलेला दादाराव आनंदा हंबर्डे (वय २६) वर्ष, रा. पाटोदा ता. नायगाव हा ऊसतोड मजूर म्हणून काम करत होता त्या तरुणाचा दि. १ एप्रिल मंगळवारी चिंचोली गावच्या पूर्व दिशेला किशन अडकिने यांच्या उसाच्या शेतात कोणत्यातरी धारधार हत्याराने अत्यंत निर्दयीपणे गळ्यावर सपासप वार करून दुपारी तीनच्या सुमारास दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली.
विशेष म्हणजे खून करणारा दिनेश व्यंकटी शिंदे (वय २२ वर्ष) मुक्काम चिंचोली ता. लोहा हातरुण मी स्वतः दादाराव हंबर्डे याचा खून केला आहे, असे सांगत गावात आला. नंतर गावातून पसार झाला. ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर ,जमादार अशोक हंबर्डे दाखल झाले इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
दरम्यान या खून प्रकरणातील आरोपी दिनेश शिंदे हा मारतळा येथील आठवडी बाजारात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतले .
फिर्यादी आनंदा दाजीबा हंबर्डे रा.पाटोदा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताच्या पार्थिवावर पाटोदा येथे दि.२ एप्रिल रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर हे करीत आहेत.