
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी : यंदा आषाढी एकादशी ६ जुलै(2025) रोजी आहे, या वारीसाठी महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची पायी वारीची तयारी सुरू झाली आहे. आळंदी येथील प्रमुख तीर्थक्षेत्रातून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, सविस्तर पालखी सोहळा पत्रिका लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती आळंदी देवस्थानचे सर व्यवस्थापक ज्ञानेश्वर (उर्फ माऊली ) वीर यांनी दिली.
आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असून, दरवर्षी लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला पोहोचतात. आळंदी ते पंढरपूर हे सुमारे अडीचशे किलोमीटरचे अंतर पायी चालत पार करणाऱ्या या वारीत टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिरसाचा अनुभव भाविक घेत असतात. असा हा अखंड भक्तीचा झरा वाहणारा पालखी प्रस्थान सोहळा 18 जून रोजी माऊली मंदिरात संपन्न होत आहे.