
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील ग्रामीण भागातील मौजे सुमठाणा ता अहमदपूर जिल्हा लातूर या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह यंदाही भक्तिभावाने पार पडला. दिनांक ६ एप्रिल रोजी सप्ताहाची सांगता आणि श्रीराम जन्मोत्सव एकत्रितपणे मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरे करण्यात आले.
सप्ताहाच्या कालावधीत गावात अखंड हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन, श्रीमद भागवत यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी नामस्मरणाचा गजर आणि संतवाङ्मयाचा प्रसार होऊन गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. सप्ताहाच्या निमित्ताने गावातील अनेक भाविकांनी सेवेत सक्रिय सहभाग नोंदवला.
सांगतेच्या दिवशी पहाटे हरिपाठ, नंतर कीर्तन, भव्य पालखी मिरवणूक आणि श्रीराम जन्माच्या निमित्ताने विशेष पूजा-अर्चा, राम जन्म सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राम जन्मोत्सवाच्या वेळी मंदिरात “राम जन्म झाला गा” चा जयघोष आणि अभंगांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमासाठी गावातील महिलांचा कीर्तन, भजन व हरिपाठ यामध्ये विशेष सहभाग होता. गावकरी, मंडळ सदस्य, युवा कार्यकर्ते यांनी एकत्र येत अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात संपूर्ण सप्ताह व राम जन्मोत्सव यशस्वीपणे पार पाडला.