
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीचे माणसं असतात. आपल्या राज्यामध्ये फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब व आण्णाभाऊ साठे जन्माला आले, जीवन जगले, अनुभवले आणि वास्तविक परिवर्तनवादी विचारांचा पाया घालून इमारत उंच गगनाला भिडणारी नव्हे तर जगाला महान बनवणारी विचारधारा आपल्याला महापुरुषांनी दिली. आणि ती सर्व जगाने आणि आपण माणूस म्हणून स्वीकारली.
आपल्यामध्ये हरितक्रांती , दुग्ध क्रांती , शैक्षणिक क्रांती , आर्थिक क्रांती व सामाजिक क्रांती झालेली आपण पाहतो आणि अनुभवतो सुद्धा. पण आपल्यातील काही जण शिक्षण घेऊन सुशिक्षित होतात का ? या प्रश्न चे उत्तर निरीक्षणातून दिसत नाही .
एखाद्या घराचं बांधकाम पाहायला जाण्याचा योग आला की मी अवश्य जातो. घरकाम करून घेणारा मालक घराबद्दल अतिशय आवडीने माहिती सांगतो. ही खोली आहे, तिची साईज यामध्ये काय – काय भौतिक सुविधा मी बनवणार आहे. आणि शेवटी ही खोली कोणासाठी ? मुलांसाठी, बायकोसाठी, पाहुण्यांसाठी , का आई-वडिलांसाठी? असे प्रश्न ऐकायला मिळतात.या सगळ्या प्रश्नांमध्ये मला शेवटच्या प्रश्नाचे उत्तर जास्त आवडते . ते म्हणजे आई-वडिलांसाठी ही रूम आहे .
एखादी इमारत खूप उंच आहे. घरामध्ये कमावणारे माणसं खूप आहेत. पण ज्या घरामध्ये म्हातारे आई-वडील राहण्यासाठी नसतात ती इमारत म्हणजे मला जणू भूत बंगलाच वाटतो. कारण “स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी “.
काही मुले तर आपल्या आई-वडिलांना बायकोचे ऐकून घराच्या बाहेर काढतात. ज्यांनी आपल्या मुलाबाळांसाठी उभ्या आयुष्याला हाडाची काड करून टाकलेली असतात. आज आपली जी परिस्थिती आहे व आपण आज जे सुख समाधान अनुभवतोय त्याचे सारे श्रेय आपल्या आई-वडिलांना जाते. पण ते मानायला तयार नसतात . कारण शिक्षणामुळे माणुस घडतो. हे खरे आहे. पण आभासी व वास्तव यामध्ये असणारा फरक आपल्याला लक्षात न येण्यासारखा झालाय. कारण वृद्धाश्रम, विधवाश्रम व बालकाश्रम हे दिसतात आपल्या डोळ्यांना. एकदा आमची डी.एडला असताना शेवटच्या वर्षी सहल गेली होती.आपापसात चर्चा चालू असताना एका वृद्धाश्रमाकडे पाहून एक वर्गमित्र व वर्ग मैत्रिण म्हणाली ” यानंतर आयुष्यात आपली भेट झाली नाही तर इथे मात्र नक्की होईल! काय आहे हा विचार?
पण आता मात्र जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत मिळणार आहे .या योजनेबाबत निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितलं की, आपल्याकडे जेष्ठ नागरिक निर्वाह कायदा आणि जेष्ठ नागरिकांच्या हक्काचं संरक्षण हे गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. ज्या व्यक्तींना मुल त्रास देतात किंवा घरातून बाहेर काढतात तसेच मुल म्हणून कोणतीही मदत करत नाही . त्या अनुषंगाने आपल्याकडे जेष्ठ नागरिक अर्ज करू शकतात . आणि अर्ज केल्यावर त्यांना अश्या प्रकरणा मध्ये मदत केली जावू शकते.
पुण्यासारख्या विद्येचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची ही अवस्था आहे. तिथं ज्योती कदम यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलय . ज्या आई -वडीलांच्या नावावर घर आहे आणि मुलाने बाहेर काढले असेल तर त्यांनी जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करून आपल घर मिळवता येतं असं सांगून हिमत दिली आणि ते मिळवूनही दिलंय या कामाबद्दल ज्योती ताईंचे कौतूक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
समाजातील सुशिक्षित मंडळी, गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष ,संरपंच, पोलिस पाटील, आणि वकिल मंडळींनी वेळो वेळी या विषयाला अनुसरून भाष्य करावे. आई – वडिलाना मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक बैठकी मध्ये, सार्वजनिक कार्यक्रमात, महापुरुषांच्या जंयतीच्या कार्यक्रमातून , ग्रामसभेतून या विषयाची जाणिव संवेदना जागृत करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे असे मला वाटते .
लेखन
श्री एकनाथ पलमटे ( भाऊ)
जिल्हाध्यक्ष
लसाकम , लातूर
मो – 8379083100