
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :-
या कलियुगात दिर्घायुष्यी व सुंदर जीवन जगायचे असेल तर विनाकारण कधीच कोणाच्या उत्कर्षावर जळू नका असे मार्गदर्शन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी बोलताना केले. ते भोकर तालुक्यातील मौजे हाळदा येथे राम जन्मोत्सवानिमित्त हिंदू राष्ट्र युवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामसेवक एम. डी. ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कामनगाव चे सरपंच राघोजी पाटील सोळंके, पत्रकार तथा माजी सरपंच बालाजी नार्लेवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर हिंदु राष्ट्र युवा मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांचा व गावातील स्पर्धा परीक्षा देऊन नियुक्ती मिळवलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या आईवडिलांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कलियुगात माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे त्याला गावातील ग्रामपंचायतीसह अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण काही गोष्टी आपणच निर्माण केल्यामुळे आपले आयुष्य कमी होत चालले आहे. त्यात प्रामुख्याने दुसऱ्याची उन्नती, दुसऱ्याचा उत्कर्ष, दुसऱ्याचा विकास पाहून आपण एकमेकांवर जळतो त्यामुळे आयुष्य कमी होत आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी अशुद्ध असल्यामुळे अनेक रोगांची निर्मिती होत असते. महाराष्ट्रात आजही पाणी अशुद्धच आहे त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने जन्मत:च अनेक मुले दिव्यांग जन्मतात. कोणाचे हात वाकडे तर कुणाचे दात वाकडे अशी अवस्था नांदेड जिल्ह्यात आहे. पण लोकप्रतिनिधींना याची जराही लाज वाटत नाही हे आपले दुर्दैव आहे असे सांगून ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना शुद्ध पाणी पाजविण्यास कटिबद्ध राहावे. गावातील मोकळ्या जागेत भरपूर फळांची झाडे लावा जेणेकरून हवा शुद्ध राहील व निरोगी जगाल. तसेच मृतदेह जाळल्या नंतर ती राख नदीत किंवा पाण्यात न टाकता आपल्या शेतात खड्डे करा आणि त्यात ती राख टाकून त्या खड्यात फळाची झाडे लावा तुम्हाला ही झाडे जन्मभर सावली व फळे देत राहतील त्याचबरोबर भूगर्भातील पाणी पातळी कायम ठेवतील असे ही सांगितले.
दीर्घ आयुष्य जगण्यासाठी अजुन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचे अन्न खाऊ नका. प्रत्येकाने आपल्या घरचेच अन्न खाल्ले पाहिजे. आपले पूर्वज बाहेर गावाला जायचे असेल तर आपली शिदोरी आपल्या सोबत बांधून नेत असत, बाहेरचे कुठलेच अन्न खात नसत. बाहेरचे अन्न जिभेला गोड लागते परंतु आपल्या प्रकृतीसाठी अत्यंत घातक असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ” हॉटेलचे खाणे | मसनात जाणे ||” तेव्हा दीर्घायुषी व्हायचे असेल तर घरचेच अन्न खा असे सांगितले. मुला मुलींना भरपूर शिक्षण द्या, त्यांच्यावर चांगले संस्कार करा व ते व्यसनाधीन होणार नाहीत याची काळजी घ्या. घरच्या व गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींवर खूप प्रेम करा तेच तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील. आपल्या स्थावर मालमत्ता महिलांच्या नावाने करा ते त्यांच उत्तम रक्षण करतील. गावातील सोयी सुविधा ग्रामपंचायतीकडून व्हाव्यात असे तुम्हाला जर वाटत असेल तर वेळेच्या वेळी ग्रामपंचायतचा कर भरा. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळप्रसंगी जीव द्या परंतु मतदानाचे पैसे घेऊ नका. तरच तुम्ही स्वाभिमानाने जीवन जगू शकाल व विकास करू शकाल असे सांगून साधू संतांचे विचार आत्मसात करून चांगले रहा, चांगले जीवन जगा, कोणाला त्रास देऊ नका एकजुटीने राहा व आपले गाव सर्वांनी मिळून नंदनवन बनवा असा मौलिक संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोशटी आरलवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार पांडुरंग भोसले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिंदू राष्ट्र युवा मित्र मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमास गावातील व पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.