
अजितदादांनी उडवली खिल्ली, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसल्या होत्या. पुणे जिल्ह्यात असलेल्या भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थानाकडे जाणार रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे.
त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरूस्त करावी, अशी मागणी करत सुप्रिया सुळे आंदोलनासाठी बसल्या होत्या. ‘रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार,’ अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली होती. अखेर 2 मे ला कामाला सुरूवात करणार, असे आश्वासन प्रशासनकडून मिळाल्यावर सुळेंनी आंदोलन सोडले. सुळेंच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्री अजितदादांना पवार यांनी टोलेबाजी करत खिल्ली उडवली आहे.
‘आमदारांना पाच कोटी निधी मिळतो. खासदारांना सुद्धा पाच कोटी निधी मिळतो. खासदार किंवा आमदार निधीतून पैसे देऊन रस्ता केला जाऊ शकत होता. तसेच, 2 मे ची तारीख कशाला? आताच काम सुरू करण्याचे निर्देश देतो,’ असेही अजितदादांनी म्हटले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले, बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हा रस्ता फक्त 600 मीटर आहे. दर मंगळवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची बैठक होते. तेव्हा, आमदार शंकर मांडेकर यांनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न मांडला. हा रस्ता फक्त 600 मीटर आहे. फार मोठा सुद्धा रस्ता नाही. माजी आमदारांनी ( संग्राम थोपटे ) लक्ष दिले नाही. पीएमआरडीए, जिल्हापरिषद किंवा जिल्हा वार्षिक योजनेतील एकाचा निधी देऊन काम तातडीने सुरू करतो, असे मांडेकरांना सांगितले आहे.
2 तारखेला काम सुरू करणार असल्याची माहिती मिळाली. 2 तारखेची वाट कशाला पाहायची? मी तातडीने काम सुरू करायला लावतो,असे अजितदादांनी सांगितले.
खासदार सुळे आंदोलन करून स्टंट करतायेत का ? असे विचारल्यावर अजितदादांनी म्हटले, नो कॉमेंट्स… मी राजकारणात 35 वर्षे काम करतोय. 600 मीटरच्या रस्त्यासाठी….असे म्हणत अजितदादा थोडे थांबले आणि म्हणाले, आमदार आणि खासदारांना 5 कोटी निधी खर्च करता येतो. रस्ता करायचा म्हटले, तर कशातूनही करता येतो. 25 ते 30 लाख रूपये निधी आमदार आणि खासदार लगेच देऊ शकतात.