
तात्काळ कॅशलेस उपचार दिले जात नसल्याने नाराजी…
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्यावर उपचारासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.
पर्यायी भिसे कुटुंबियांवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार करावे लागले असून यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यावरून संतप्त वातावरण असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने देखील रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.
देशामध्ये रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तात्काळ मोफत उपचार सुरू करण्याची योजना लागू होण्यास विलंब झाल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. यावर न्यायालयाने रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना 28 एप्रिलला स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक महत्त्वाचा आदेश दिला होता. रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना पहिल्या काही तासांत कॅशलेस आणि तात्काळ उपचार दिले जावेत यासाठी योजना तयार करण्यात यावी. यासाठी सरकारला न्यायालयाने 14 मार्च पर्यंतचा कालावधी दिला होता. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत रस्ते वाहतूक मंत्रालयाला खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेत कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरीक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बबिता कमलापुरकर यांच्याकडे कुटुंब कल्याण विभागाचा अतिरीक्त पदभार होता.
कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यु रोखण्याची मुख्य जबाबदारी असते. अतिरीक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढून डॉक्टर संदीप सांगळे यांच्याकडे पदभार देण्यात आले आहे मात्र आता देखील या महत्वाच्या पदावर पुर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात न आल्याने आरोग्य विभागावर टीका देखील होत आहे.
तर दुसरीकडे कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त पदभार काढल्यानंतर डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार असणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापुरकर यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु झाली आहे.