
बच्चू कडूचं काय आहे आंदोलन ?
राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे कर्जाची पूर्ण रक्कम परत करावी लागणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. यासाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून उद्या रात्री 11 एप्रिल रोजी बच्चू कडू आंदोलन करणार आहेत.तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. सरकारने निवडणुकीमध्ये शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकर्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकर्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
त्याचबरोबर कृषिमंत्र्यांच्यावर देखील बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे तुम्ही कृषिमंत्री आहात तुम्ही शेतकर्यांचे पालक आहात,मी त्यातला नाही असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकर्यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.हातात मशाल ,गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केल आहे.