
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठे उलथापालथी सुरू असताना, मूळ शिवसेनेशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने दिलेला सन्मान आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशाच निष्ठावान व कर्मठ कार्यकर्त्यांपैकी एक असलेले कैलास पाटील यांची शिवसेना उबाठा गटाच्या लातूर उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर संपूर्ण लातूर जिल्ह्यात विशेषतः उदगीर तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी जल्लोष आणि सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे.
कैलास पाटील हे शिवसेनेत दीर्घकाळापासून सक्रिय असून, त्यांनी तालुकाप्रमुख पदावर असताना केलेले संघटनात्मक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय ठरले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवणारे आणि जनसामान्यांमध्ये चांगली पकड असलेले पाटील यांचं नेतृत्व कौशल्य पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या निवडीनंतर शिवसेनेच्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील संघटन रचना अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नव्या जबाबदारीसंदर्भात बोलताना कैलास पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपण सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी शिवसेनेसोबत आहोत. शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण जनता पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकेल, यात मला शंका नाही.” तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे कार्यकाल हा देशभरात एक आदर्श ठरल्याचेही नमूद केले.
या निवडीसोबतच इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे. सिद्धेश्वर औरादे यांची शिवसेनेच्या सहसचिव पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्यावर लातूर ग्रामीण, उदगीर, आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते अंकुश कोनाळे यांना उदगीर विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रा. दत्ता मोरे यांची नियुक्ती विधानसभा समन्वयक पदावर, तर प्रशांत मोरे यांची उदगीर तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय विकास सोमवंशी (जळकोट तालुकाध्यक्ष), बालाजी सोनाळे (उदगीर शहरप्रमुख), व्यंकट साबणे (उदगीर तालुका समन्वयक) आणि शंकर धोंडापूरे (जळकोट तालुका संघटक) या कार्यकर्त्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला गती मिळेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत शिवसेनेच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान करून पक्ष संघटनेला नवी दिशा देणाऱ्या या निर्णयामुळे, उबाठा गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेना नव्या उमेदीने आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.