
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सविस्तर…
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली.
याप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्या कागदपत्रांची जंत्री आज आम्ही सीआयडीमार्फत दिले, तसेच काही दस्तऐवज सीलबंद असल्यामुळे ते उघडल्यानंतर आरोपींना देण्यात यावे, असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिकने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्याविरोधात काही प्राथमिक पुरावा नाही, असा न्यायालयात अर्ज केलेला आहे. या अर्जावर न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे. सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याच्यावर सुनावणी होईल. आज न्यायालयात हजर केलेल्या कागदपत्रांत संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आहे. न्यायालयाला आम्ही विनंती केली की, या व्हिडिओला बाहेर कुठेही प्रसिद्धी मिळू नये.
न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं मागितलं आहे. ते 24 तारखेला सादर केला जाईल मग निर्णय होईल. आजच्या सुनावणीतील चौथा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करण्यात यावी. असा अर्ज न्यायालयात दिलाय. त्यावर अजून वाल्मिक कराडची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आरोपीने अर्ज केल्यामुळे आता त्याच्यावर सुनावणी होईल. वाल्मिकने त्याच्या अर्जात अनेक मुद्दे उपस्थित केलेत. तो खुनात नाही, त्याने खंडणी मागितलेली नाही, असं अर्जात नमूद केलंय. सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र जमा केली आहेत. कायद्यांतर्गत पुढील तपास अजूनही चालू आहेत. मकोका कायद्याखाली त्याची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज दिले आहेत. नवीन सीआयडीतर्फे अर्ज देण्यात आला असल्याचं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय.
सीआयडीने काही मुद्देमाल तपासला होता. तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. तो आता सीलबंद न्यायाकडे पाठवण्यात आला असल्याचं देखील उज्वल निकम यांनी सांगितली. 24 तारखेला मला खटल्यातुन मुक्त करा, या अर्जावर वाल्मिकचा खुलासा मागितला आहे. तो खुलासा सीआयडीतर्फे दाखल करण्यात येईल. मग सुनावणी होईल, त्यानंतर आरोपी निश्चिती करण्याची कारवाई सुरू होईल, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.