
आमच्या बहिणीलापण उपोषण करायला नको…
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याच्या मुद्यावरुन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच उपोषण केले. गेल्या दोन दिवासंपासून या रस्त्याच्या मुद्यावरुन अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावा-बहिणीमध्ये कलगितुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
आज पुन्हा एकदा अजित पवारांनी आमच्या बहिणीलापण उपोषण करण्याची वेळ यायला नको म्हणत या रस्त्याचे काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दोन दिववसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी त्यांनी धरणे आंदोलन केले आणि त्याच ठिकाणी त्यांनी उपोषण सुरु केले होते.
बनेश्वर देवस्थानच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून जिल्हा प्रशासन रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता.
सुप्रिया सुळे यांच्या उपोषणावरुन अजित पवारांनी त्यांना डिवचले होते. आमदार, खासदारांना पाच – पाच कोटी रुपये निधी असतो. त्यामधून 600 मीटर रस्त्याचे काम सुप्रिया सुळे करु शकल्या असत्या असा टोला अजित दादांनी लगावला होता. आज फुले वाडा येथे महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादनासाठी अजित पवार आले होते, तेव्हा पत्रकारांनी पुन्हा त्यांना बनेश्वर रस्त्यावरुन छेडले. यावेळी अजित पवार म्हणाले की, बनेश्वरच्या 600 मीटरच्या रस्त्याचं काम तातडीने सुरू होईल, तशा सूचना दिलेल्या आहे. आता परत कोणालाही उपोषण करण्याची वेळ येऊ नये, माझ्या बहिणीलापण उपोषण करायला लगायला नको, लवकरात लवकर या रस्त्याचं काम कर, अशा सूचना दिल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.