
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर शहरात सराफा दुकानावर फायरिंग करून दहशत माजवणाऱ्या सराईत गुंड शरद बन्सी मल्लाव (वय २५, रा. काची आळी, शिरूर) याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी MPDA (महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्ये कायदा) अंतर्गत कठोर कारवाई केली.ही कारवाई २०२५ मधील पुणे ग्रामीण विभागातील पहिलीच धडक कारवाई ठरली आहे.
शरद मल्लाव हा शिरूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध २०२१ ते २०२४ दरम्यान शिरूर, रांजणगाव आणि पाली (जि. रायगड) पोलीस ठाण्यांत ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले, मालमत्तेचे नुकसान आणि दमदाटी यांचा समावेश आहे.
यापूर्वी शरदला दोनदा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, पण त्याच्या गुन्हेगारी वृत्तीत बदल झाला नाही. हद्दपारीदरम्यानही त्याने गुन्हे सुरूच ठेवले. अखेरीस, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या शिफारशीवरून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार त्याच्यावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झाली. ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्याला काची आळी येथून ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांचा सहभाग होता. २०२४-२५ मध्ये शिरूर पोलिसांनी ४ सराईत गुंडांवर अशी कारवाई केली आहे. पुढेही अशा कठोर कारवाया सुरू राहतील, असे पोलीस निरीक्षक केंजळे यांनी सांगितले.