
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी..श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे सुरू असलेले तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिर (१० ते १२ एप्रिल २०२५) आज दुसऱ्या दिवशी अधिकच भाविकांच्या महासागराने गजबजले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळाच्या पावन परिसरात, आजही पहाटेपासूनच विविध वयोगटांतील हजारो भक्तांनी मुंबई मराठा फ्रुट वाला धर्मशाळा मैदान परिसरात लागलेली गुरुतत्त्व प्रदर्शनीस भेट देण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी सूर्यास्त समयी परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या प्रवचन आणि ध्यानाच्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी आतुरतेने घेतला. यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून देहू देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम म. मोरे, ॲडिशनल डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ वेस्ट बंगाल पोलीस अजय रानडे अपर आयुक्त -आदिवासी विभाग ठाणे गोपीचंद कदम, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर ,तहसीलदार निलेश जाधव ,राणा सूर्यवंशी ,सुसाने वेबनार जर्मनी ई.मान्यवर उपस्थित होते .त्यांचे हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.
आळंदीचे वातावरण जणू हिमालयात रूपांतरित झाल्याचे अद्भुत अनुभव प्रत्येक जण घेत आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूर् ब्रह्मा ,गुरुर्विष्णु ,गुरुर्देवो महेश्वरा! गुरुर साक्षात परब्रम्ह — म्हणजेच गुरूला परब्रम्हाचे स्थानी पूजलेले आहे. याचाच अर्थ परमात्मा गुरूच्या रूपाने आजही समाजात कार्यरत आहेत असे यावेळी परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी आपल्या व्याख्यानात म्हणाले.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत, आळंदीतील ही दिव्य साधना एक ऐतिहासिक अध्याय ठरत आहे. आळंदी मध्ये आलेल्या या हिमालयीन चैतन्य गंगेचा लाभ पुणे आणि आळंदी परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.