
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक असलेल्या उदगीर किल्ला व उदागिर बाबा महाराजांच्या समाधीस्थळाचा जपणूक करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी घेतलेले पुढाकार अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे उदगीर शहराचा गौरव पुन्हा एकदा उजळून निघत आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही २२ ते २९ मार्च २०२५ दरम्यान उदागिर बाबा महाराजांचा वार्षिक उत्सव अत्यंत भाविक भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने दीड लाखांहून अधिक भाविकांनी समाधीस्थळी दर्शन घेतले. या उत्सवाच्या निमित्ताने उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्य, त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याची दुरवस्था यांकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
इतिहास सांगतो की, उदगीरचा भुईकोट किल्ला इ.स. १३४७ ते १५२७ दरम्यान चालुक्य राजवटीच्या काळात बांधण्यात आला. ‘तारीख-ए-फरिश्ता’ व ‘तारीख-ए-उदगीर’ या ग्रंथांमध्येही याचा स्पष्ट उल्लेख आहे. या किल्ल्याच्या अनेक भागांची पडझड होऊन अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र, ही वास्तू केवळ दगडांची नव्हे, तर इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे, हे लक्षात घेऊन आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी या परिसराच्या दुरुस्तीचे, जतनाचे आणि सौंदर्यीकरणाचे काम स्वतःच्या जबाबदारीने हाती घेतले.
भौतिक विकासाच्या युगात संजयभाऊंनी ऐतिहासिकतेचा आदर राखून, त्याच पारंपरिक शैलीने किल्ल्याचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. एकूण २१ कोटी ५३ लाख रुपये निधी मंजूर करून घेऊन त्यापैकी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यांच्या अंगभूत तळमळीतून, जिव्हाळ्याने आणि समर्पित दृष्टिकोनातून हे काम पार पडत आहे.
उदगीरचा किल्ला म्हणजे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अस्मितेचा भाग आहे. उदयगिरी नावाने ओळखले जाणारे हे स्थान आजही बालाघाट पर्वतरांगेत डौलाने उभे आहे. उदगीरवासीयांच्या भावना आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या या किल्ल्याच्या दुरुस्तीतून आमदार संजयभाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक नवा आयाम जनतेसमोर ठेवला आहे.
महाराष्ट्रात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, आणि भुईकोट किल्ल्यांची मोठी परंपरा आहे. जर प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींनी संजयभाऊ बनसोडे यांच्या प्रमाणे ऐतिहासिक ठेव्यांच्या संवर्धनासाठी इच्छाशक्ती दाखवली, तर निश्चितच महाराष्ट्राचे हे वैभव भावी पिढ्यांसाठी जपले जाईल.
संजयभाऊंच्या कार्याची दखल घेणं ही काळाची गरज आहे. कारण त्यांनी केवळ राजकीय पुढाकार न घेता, संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा सन्मान ठेवत आधुनिकतेला पुरक असा आदर्श प्रकल्प राबवला आहे.
—