
मंत्री जयकुमार गोरेंची माळशिरसच्या सभेतून तूफान फटकेबाजी…
माळशिर: आपण कोणाच्या वाटेला जायचे नाही आणि कोण आपल्या वाटेत आले तर सोडायचे नाही, हे आपले तत्व आहे. आताही मला अडकवण्यात जे काही समोर येत आहे त्यात एक अकलूजचा मेसेजही आहे.
मी आज काही स्पष्ट बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी समोर येतील. सध्या अनेक सावज टप्प्यात आलेली आहेत, एवढेच सांगतो. असे सांगत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी फटकेबाजी करत विरोधकांना खडेबोल सुनावले आहे. यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी बारामतीकर, अकलूजकर यांच्यावर थेट निशाणा साधला.
माळशिरस येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीत निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, राम सातपुते, आप्पासाहेब देशमुख आणि माळशिरस तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. रात्री उशिरा हा कार्यक्रम होऊनही गोरे यांच्या सत्कारासाठी अवघा माळशिरस तालुका लोटला होता.
माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता, तोच मला फोन..
आपली लढाई कायम प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. प्रस्थापितांनी विस्थापितांना कायमच अन्याय केल्याने विस्थापित लढायला उभे राहिले . माझ्या पहिल्या निवडणुकीत मी थेट अपक्ष म्हणून निवडून आलो, या वेळेला बारामतीकर खासदार होते. आमच्या भागातील सर्व आमदार त्यांचेच अगदी आम्ही दगड उभा केला तरी तो निवडून येईल, ही त्यांची भाषा होती. मात्र मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली. माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता. मी मुंबईला आणि दिल्लीला भेटायला जात असताना मला फोन आला की तुमच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सरकार यांचे, पोलीस यांचे आणि माझ्या विरोधात उभा असणाऱ्याचा खुनाचा प्रयत्न मी पोलिसांकडून सुपारी घेवून केला, असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. म्हणजे सरकार यांचे, पोलीस यांचे आणि तरीही त्याच पोलिसांना मी सुपारी देतो, अशा पद्धतीचे प्रयत्न तर पाकिस्तानात सुद्धा होत नाहीत, ते यांनी करून दाखवले. अशी सडकून टीका बारामतीकरांवर केली.
माळशिरस तालुक्यातील दहशतीवर बोलताना त्यांनी कुत्र्याची मजेशीर गोष्ट सांगितली. मोटर सायकलच्या मागे कुत्रे लागत असतात. तुम्ही जेवढी मोटरसायकल पळवाल तेवढे ते वेगाने तुमच्या मागे धावत असतात. मात्र तुम्ही वेग कमी केला की त्याचा वेग कमी होतो. तुम्ही गाडी थांबवली की ते थांबते आणि तुम्ही खाली वाकून दगड उचलायचा प्रयत्न केला की ते उलटे पळायला लागते. म्हणजे जे तुमच्या मागे लागलेले होते ते तुम्ही प्रतिकार करण्याची भूमिका घेताच उलटे पळून जातात. या दहशतीलाही हेच उत्तर असेल असे सांगत यापुढे दहशतीला भीक घालू नका, असे ही त्यांनी सांगितले.
मी पालकमंत्री नको म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले- जयकुमार गोरे
मी पालकमंत्री होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घालून बसले होते. पण मी इथे कोणाची जिरवायला अथवा साम्राज्य उध्वस्त करायला आलो नसून मी माझा पक्ष वाढवायला आलोय. त्यामुळे मी या लोकांच्या कायम सोबत असणार आहे असेही टे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या पंचवीस वर्षाची टीम तयार केली असून ही सर्व टीम बहुजन समाजातील विस्थापितामधील आहेत. आता ह्या स्टेजवर तर सर्वच असे नेते आहेत असे सांगताना राम सातपुते ऊस तोडवाला, गोपीचंद पडळकर मेंढरे सांभाळणारा आणि मी रेशन दुकानदाराचा पोरगा. पण आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलांना देवा भाऊने मोठे केले. ते गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे आम्ही बहुजन समाजातील तरुण छातीचा कोट करून मुख्यमंत्र्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतो आणि राहणार असेही ते म्हणाले.