
संजय घाटगेंसाठी उघडलं भाजपचं दार !
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार संजय घाटगे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. घाटगे यांचा भाजपमधील प्रवेश कागलमधील राजकीय समीकरण बदलणार आहे.
शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गळती लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कोल्हापुरात हा मोठा धक्का मानला जात आहे. संजय घाटगे हे भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात मंगळवारी (ता.15) दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
तर प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत घाटगे कागलमध्ये मोठा मेळावा घेत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. घाटगे हे विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या संपर्कात होते. जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व्हाया ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
तर संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघाची राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. कागल मतदारंसघ हा राज्यभरातील एक महत्वाचा आणि चर्चेत असणारा मतदारसंघ आहे.
या मतदारसंघातून 1998 च्या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांचा भराभव केला होता. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकींमध्ये तब्बल 5 वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगेंना पराभूत केलं आहे. दरम्यान, पक्षापेक्षा गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात असलेल्या कागल मतदारसंघातील ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
त्यानंतर त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूकही लढवली. मात्र, त्यांना पराभवावाचा सामना करावा लागला. याआधी भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले समरजितसिंह विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्याआधीच संजय घाटगे भाजपने समरजित घाटगेंना डावलून संजय घाटगेंना आपल्यासोबत घेतलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडणाऱ्या समरजित घाटगेंना धडा शिकवल्याच्या चर्चा सुरू आहेत.,