जयंत पाटलांचा भाऊच हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात; रायगडामध्ये पंडित पाटलांची मोठी राजकीय खेळी
रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माझ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होईल, शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडित पाटील काय आहे ते इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आज दोन्ही पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज(16 एप्रिल) सकाळी 11 वाजता पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितलं जातंय.
शरद पवार गटाच्या अनिल नवगणे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, दक्षिण रायगडचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदर संघातील उमेदवार अनिल नवगणे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर प्रवेश केला. या प्रवेशावेळी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जैस्वाल,आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार राजन साळवी, आमदार तुकाराम काते उपस्थित होते. नवगणे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत हा प्रवेश केला आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपला राज्यात मोठे यश मिळाले आहे. कधी नव्हे तो भाजप आणि महायुतीला जनतेने पसंती देत मोठा विजय मिळवून दिला आहे. या यशानंतर गेल्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून भाजपचे (BJP) संघटन पर्व जोमाने सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यातच, आता माजी आमदार आणि वडिल मंत्री राहिलेल्या हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात श्रीरामपूरमधील माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसमधील 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे.
कोल्हापूर,अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस, युबीटी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. तर, साताऱ्यातही रामराजे निंबाळकर गटाला भाजपाकडून धक्का देण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात हे पक्ष प्रवेश झाले आहेत.
