
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
चाकण पोलिसांची मोठी कामगिरी
चाकण – बहुल (ता. खेड) गावात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला चाकण पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. इतर आरोपींना अटक करण्यासाठी चाकण पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा येथे १५ दिवस ट्रॅप लावून सहा जणांना पकडले आहे. त्यात एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
परश्या गौतम काळे, भीमा आदेश काळे, धंग्या चंदर भोसले, राजेश अशोक काळे, अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले याला पोलिसांनी ३ मार्च रोजी अटक केली आहे. आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन दुचाकी, हत्यारे, असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा दरोडे घातल्याचे उघडकीस आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून जयराम यांचा मुलगा अशोक आणि त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या पोटात चाकू, तलवारीने वार केले. दरोड्याच्या घटनेतील आरोपी पुन्हा दरोडा टाकण्यासाठी चिंचोशी गावात आले असल्याची माहिती मिळाल्यावर उपायुक्त शिवाजी पवार, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दरोडेखोर टप्प्यात येताच अटक करण्यासाठी पोलिस सरसावले असता एका दरोडेखोराने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे जखमी झाले होते.
सोनार आणि नातेवाइकालाही अटक
आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार अभय विजय पंडित (३८, श्रीगोंदा, अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक केली. आरोपी सचिन भोसले याचा नातेवाईक गणेश शिवाजी काळे (श्रीगोंदा, अहिल्यानगर) याने आरोपींना आश्रय दिला. त्यामुळे गणेश काळे याला देखील अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुन्हे नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, गणपत धायगुडे, दत्तात्रय सुकाळे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, दत्ता टोके, राजु जाधव, अनिकेत पाटोळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, नवनाथ खेडकर, सुनिल भागवत, उध्दव गर्जे, महेश कोळी, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, किरण घोडके, विकास तारु, कैलास गर्जे, प्रतिक चव्हाण यांनी केलेली आहे.