
सरपंच अन् कार्यकर्त्यांकडून सत्र न्यायालयातील वकिल महिलेला जबर मारहान…
गेल्या अनेक दिवसांपासून (Beed ) बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरात चर्चेत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाचा धुराळा बसत नाही तोपर्यंतच आता अंबाजोगाईतालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेलीय. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मारहाणीचा प्रकार
घटनेतील पडीत महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती. त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रिंगण करून काठ्या पाईपने मारहाण
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली आहे. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.