
भाजपच्या प्रा. राम शिंदेंच्या दाव्यानं खळबळ…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार काल जामखेड दौऱ्यावर होते. अजितदादांच्या स्वागताचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार बॅनर बाजी केली होती.
भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावर खळबळजनक टिप्पणी केली आहे.
अजितदादांच्या पक्षात प्रवेशासाठी रोहित पवार सध्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतील, मतदारसंघात लवकरच गुड न्यूज देतो, असे सांगत होते. मात्र तसं होणार नाही, सध्या महायुतीकडे 235 आमदार आहेत, असेही प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटातील नगरसेवकांनी बंडखोरी करत सत्तांतर घडवण्याचा घाट घातला आहे. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी करत विद्यमान नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. आमदार रोहित पवार यांनी यावर पुणे इथं पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांना हटविण्याचा नगरसेवकांना अधिकार देण्याच्या नवीन अध्यादेशावरून महायुती सरकारवर आणि प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
प्रा. राम शिंदे यांनी अध्यादेश हा केवळ कर्जतसाठी किंवा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नसून, तो संपूर्ण राज्यासाठीचा आहे. मी संविधानिक पदावर आहे. मी कोणताही गैरकृत्य करत नाही. रोहित पवार यांनी अध्यादेशावर बोलण्यापेक्षा 15 पैकी 13 नगरसेवक कसे गेले, यावर बोलायला हवं होतं. संविधानिक आणि कायद्याची गोष्ट बोलायची झाली, तर ही निवडणूक रोहित पवार यांनी कशाप्रकारे केली, हे अजून कर्जतची जनता विसरलेली नाही, असा टोला लगावला.
तुम्हाला मीडिया पुढे यायला दहा दिवस लागले, त्याआधी तुम्ही विनवण्या केल्या, मात्र कुणीही ऐकलं नाही. दहा दिवसानंतरही 13 सदस्य तुमच्या विरोधातच राहिले, सात तारखेला आलेला अविश्वास पुन्हा 16 तारखेला तसाच राहिला. राजकीय प्रोटोकॉल फक्त आम्ही पळायचे का? एखादा पक्षप्रवेश झाल्यानंतर हा कुठला शिष्टाचार? असा सवाल प्रा. राम शिंदेंनी केला.
सभापती पद देऊन भाजपने राम शिंदे यांचा आवाज दाबला, असंही रोहित पवार यांनी त्यावेळी म्हटल्याची आठवण प्रा. राम शिंदेंनी करून दिली. कुठल्याही पदामुळे आवाज दाबला जात नाही. अजितदादा पदावर गेले म्हणजे, त्यांचा आवाज दाबला आहे का? रोहित पवारांच्या पक्षाचे दहा आमदार आले, मात्र त्यांना कुठलेही पद दिले नाही, यावर त्यांनी बोलले पाहिजे, अशी टिप्पणी देखील प्रा. राम शिंदे यांनी केली.
आपण एवढ्या घराण्याचा वारसा सांगता, मग 622 मतांनी निवडून आले, यावर चिंतन व्हायला पाहिजे, यावर पुन्हा बोलत प्रा. राम शिंदेनी आमदार पवार यांना डिवचलं. आज अजितदादांचं तुम्ही मतदारसंघांमध्ये फ्लेक्स लावून स्वागत केलं, आमची काही हरकत नाही. मात्र तुम्हीच अजितदादा बद्दल काय काय बोलले, तुमच्या सोयीने असेल, तर सगळं बरोबर आणि विरोधात असेल, तर चुकीचं असं होतं नाही, असेही प्रा. राम शिंदेंनी म्हटलं. तुमचं पक्षात असलेलं दहा आमदारांमधलं स्थान आता जनतेने ओळखलं आहे, असाही खोचक टोला शिंदेंनी पवारांना लगावला.