
उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या स्वतःशिवाय कोणीच कंट्रोल करू शकत नाहीत. अधिकृत आर्थिक सल्लागार नसेल तर ‘किचन कॅबिनेट’चा प्रादुर्भाव होतो, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी लगावला.
डॉ. गोर्हे शुक्रवारी सांगली दौर्यावर आल्या होत्या, यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मुख्यमंत्री कार्यालयात माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करून, हे अस्तित्वात नसलेले पद अर्थमंत्री अजित पवार यांना कंट्रोल करण्यासाठी तयार केले आहे का?’, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना नीलम गोर्हे म्हणाल्या, अजित पवार हे स्वाभिमानी आणि स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. यापूर्वीही नियोजन आयोग आणि नीती आयोग होतेच. त्यानुसार राज्यात काही बदल होणे अपेक्षित आहे. अनधिकृत आर्थिक सल्लागार असण्यापेक्षा अधिकृत सल्लागार असलेला बरा. त्यामुळे किचन कॅबिनेटचा प्रादुर्भाव होतो. प्रवीण परदेशी हे अत्यंत अनुभवी, कार्यक्षम व संवेदनशील अधिकारी आहेत. चांगल्या अधिकार्याच्या अनुभवाचा फायदा होतो.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. आमच्याकडून कार्य चांगले होत असल्यामुळे आमच्यातील पक्षप्रवेश वाढला आहे. आगामी काळातील पाणीटंचाईबाबत मंत्रालयात विभागवार अधिकार्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराबाबत त्यांना क्लिन चिट दिल्याबाबत मला माहिती नाही. त्याची माहिती घेऊन याबाबत भाष्य करणे योग्य होईल.
यावेळी शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले उबाठा शिवसेनेचे राज्य संघटक बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सुनीता मोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबिगिरे, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.