
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ…
सोलापुरातील विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला आहे.
जनसेवेचं व्रत घेतलेल्या आणि हजारो रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरचा अशा प्रकारे शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या रुग्णालयात डॉ. वळसंगकरांनी हजारो रुग्णांना सेवा दिली त्याच रुग्णालयात वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू होता. तब्बल 8 ते 10 जणांची टीम डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र गोळी मेंदूला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळात त्यांचे एक एक अवयव निकामी होऊ लागले होते आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.
वळसंगकर रुग्णालयात गेल्या साडे चार वर्षांपासून रुग्णसेवा करणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ गांधी यांनी वळसंगकरांच्या मृत्यूवर खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी वळसंगकरांच्या आठवणींना उजाळा दिला. वैद्यकीय क्षेत्रात वागताना ते रुग्णांबाबत कायम संवेदनशील होते. ते चांगले मेंदूविकारतज्ज्ञ तर होतेच शिवाय ते परफेक्शनिस्ट होते. त्यांची सहा महिन्यांपूर्वी हृदयावरील शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना वर्ल्ड टूर करण्याची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वत:च विमान खरेदी केलं होतं. ते उत्कृष्ट वैमानिकही होते. ते एव्हिएशन इन्स्टिट्यूट चालवायचं. येथे ते पायलटांना ट्रेनिंग देत होते. त्यांना विमान घेऊन जग फिरायचं होतं. मात्र अचानक झालेल्या वळसंगकर यांच्या मृत्यूमुळे त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. याशिवाय त्यांना वाडिया रुग्णालय पुन्हा सुरू करायचं होतं. वाडिया रुग्णालय सुरू करायचं.. ज्या रुग्णालयाने मला घडवलं ते बंद असल्याचं दु:ख वळसंगकरांनी व्यक्त केलं होतं. ते रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचं डॉ. सिद्धार्थ गांधी यांनी सांगितलं.
रुग्णालयातील महिला अधिकारीला अटक
वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहिली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोण आहेत डॉ. वळसंगकर?
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. त्याआधी डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी MBBS आणि MD पदव्या शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केल्या आहेत. तसेच, त्यांनी लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे