
कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून…
पुण्यातील चंदनगर परिसरात एका तरूणाच्या डोक्यात फरशी घालून संपवल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत संतोषनगर परिसरात रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली., शुभम सुभाष चव्हाण (वय २६ वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अमोल चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास शुभम संतोषनगर भागातून निघाला होता. ओम साई मित्र मंडळ परिसरात आरोपी अमर आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला अडविले. आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला बांबू आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. दरम्यान शुभम सोबत असलेल्या मित्रांनी शुभम च्या घरी माहिती दिल्यानंतर घरच्यांनी पोलिसांना खबर दिली. अमोल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी तीन आरोपींविरोधात आंबेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली तसेच पोलीसांकडून आरोपी मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. शुभमच्या घराशेजारी असलेल्या जागेवरुन शुभम आणि अमर यांच्या मध्ये वाद होते. या वादातून हा खून झाला असल्याचे सांगितले जात आहे. अमर वर २०१० मध्ये बॉडी ऑफेन्सचा गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधार्थ पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. खूनासाठी बांबू आणि दांडक्याचा वापर केला गेला आहे.