दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी एक निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपजिल्हाधिकारी मार्फत सादर करण्यात आले. राज्यातील शेतकरी बांधवांच्या जीवन-मरणाशी संबंधित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आले असून, शासनाच्या निष्क्रियतेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करावी.
शेतकऱ्यांची वीज बिले माफ करून भारनियमनमुक्त करण्यात यावे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील त्रुटी दूर करून बाधित शेतकऱ्यांना समान लाभ मिळावा.
मराठवाड्यातील पिक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
राज्यातील महिलांना प्रति महिना ₹२१०० चे अनुदान तात्काळ देण्यात यावे.
हे निवेदन छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील मांजरीकर यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी उत्तम बिरादार, विशाल देवणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मनोज पाटील म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघड होत आहेत. हे पैसे जनतेच्या कष्टाच्या करातून गेले आहेत. सध्या लाखो शेतकरी नैसर्गिक आपत्ती व आर्थिक संकटामुळे अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत.”
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय, उदगीर येथे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
छावा संघटनेने उदगीर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांना आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.