हल्ल्यानंतर काय म्हणाले दहशतवादी ?
मुंबई : दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. या हल्ल्याच्या वेळी देखील गोळ्या घालताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या अनेकांनी या हल्ल्यात आपल्या घरातील पुरुषांना गमावले. यात कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला तर कोणाचा नवरा मारला गेला. मात्र, कोणीही महिला किंवा मुलांना मारलेले नाही. या दहशतवादी हल्ल्याची झळ बसलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया नंतर समोर आल्या. यात पुण्यातील जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे हिने या हल्ल्याचा ऑंखो देखा हाल सांगितला.
दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा आम्ही एका तंबूत लपून बसलो होतो. दहशतवादी आमच्या तंबूसमोर आले आणि त्यांनी माझ्या बाबांना बाहेर बोलावले. त्यांना अजान म्हणायला सांगितली. पण ते हिंदू असल्याने सहाजिकच त्यांना काही ते जमले नाही. आणि नेमक्या याच कारणावरून आसावरीचे बाब आणि त्यांच्यासोबत आलेल्या कौस्तुभ गणबोटे यांना जीव गमवावा लागला. त्यांच्यावर गोळ्या झाडतानाही त्या दहशतवाद्यांनी भारतावरील आपला राग व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी दहशतवादी भारतीयांना बोल लावत होते. तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय. तुमच्यामुळे मोदी मोठे झाले आहेत. आम्ही कधी महिलांना मारतो का? मग तसं का बदनाम करता? असं दहशतवाद्यांनी विचारलं. महिला आणि मुलांना आम्ही काही करत नाही, तरीही आमची बदनामी करता, असे त्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी म्हटले. याचा प्रचंड राग असल्यानेच त्यांनी हे कृत्य केले असावे. तुम्ही आम्हाला बदनाम केलंय. आमच्या धर्माला बदनाम व्हावं लागत आहे. असंही दहशतवाद्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी वडिलांना अजान म्हणायला लावली. पण ते म्हणू न शकल्याने बाबांना 3 गोळ्या घातल्याचे आसावरीने सांगितले होते.
असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील मंजूनाथ राव यांच्याबाबतीत घडला. मंजुनाथ राव हे देखील दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी – पल्लवी देखील होती. मंजुनाथ यांना मारल्यानंतर त्यांची पत्नी पल्लवीने दहशतवाद्यांना आपल्याला देखील गोळ्या घालण्यास सांगितले होते. पल्लवी म्हणतात, मी त्यांना म्हणाले की, मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या पतीला आधीच मारले आहे. त्यापैकी एक म्हणाला, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जा आणि हे मोदींना सांगा,” असं पल्लवी यांनी सांगितलं.
एकंदरीतच या दहशतवाद्यांच्या मनात भारत सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल टोकाचा द्वेष दिसला. दहशतवादी सातत्याने त्यांचेच नाव घेत होते. बायका – मुलांवर आम्ही हल्ला करत नाही, असे सांगत त्यांनी फिरायला आलेल्या पुरुष पर्यटकांनाच टार्गेट केले.
